विद्युत खांबावर काम करताना विजेच्या धक्क्याने खासगी विज कामगाराचा मृत्यू: संतप्त नागरिकांनी केला रस्ता रोको!

पुसद :तालुक्यातील माळ पठार परिसरातील रोहडा बेलोरा मारवाडी विद्युत विभागाच्या बीटमध्ये विजेच्या खांबावर चढून काम करीत असताना खासगी वीज कामगाराचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून विद्युत विभागाच्या लाईन मंचा हलगर्जीपणामुळे या कामगाराच्या मृत्यू झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करीत रस्ता रोको करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नामदेव पांडुरंग मारकड वय अंदाजे ३५ वर्षे रा. बेलोरा मयत झालेल्या वीज कामगारांचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, आज दि.२३ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रोहडा गावच्या हद्दीत पुलाजवळ विजेचे काम करण्यासाठी नामदेव पांडुरंग मार्कड हा विजेच्या खांबावर चढला असता, त्यास ऑपरेटरने कोणतीही पूर्व सूचना न घेता वीजपुरवठा केल्याने या कामगारास विजेचा धक्का लागून त्याचा खांबाला चिटकून जागी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी गर्दी करून मारवाडी फाट्यावर रस्ता रोको केला. जोपर्यंत मृत्यूच्या कारणाचा योग्य तपास लागल्याशिवाय मृतदेह जाग्यावरून हलण्यास नातेवाईकांनी विरोध केला.
यावेळी खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांनी तुमचे काय म्हणणे असेल तर द्या, असे सांगत नातेवाईकांची समजूत काढून सदरचा मृतदेह उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनासाठी हलविण्याची विनंती केली परंतु नागरिक यास विरोध करीत आहे जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविला जाणार नाहीं असे ठणकून सांगण्यात आले.
परंतु विशेष म्हणजे यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता किंवा उपकार्यकारी अभियंता तसेच शाखा अभियंता यांनी घटनेच्या ठिकाणी भेट सुद्धा दिली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर घटला जबाबदार असलेले महावितरण चे कर्मचारी फरार झाले असून या कामासाठी खांबावर चढण्यासाठी कोणी प्रवृत्त केले व या कामासाठी वीजपुरवठा बंद केल्याचे परमिट घेतले होते का? आदी कारणावरून प्रश्नांची सरबत्ती करत याच्या मृत्यूला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न नामदेव मार्कडच्या मृत्यूनंतर नागरिकांनी उपस्थित करून रस्ता रोको करीत संताप व्यक्त केला आहे.
विजेच्या कामासाठी प्रत्येक गावात महावितरणच्या कर्मचारी नेमलेले आहेत.विद्युत दुरुस्तीचे काम करत असताना, योग्य परमिट घेणे व महावितरणचा लाईनमन घटनास्थळी हजर असणे अपेक्षित असताना या प्रकाराकडे महावितरणने देखील दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे अशा दुर्लक्षामुळे एखाद्या गरिबाचा हाकनाक बळी जात आहे. तरीही महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने कधी घेणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.