विद्यार्थी जीवनातच जलसंवर्धनाचे महत्त्व ओळखा- डॉ. माधवी गुल्हाने : जनता शिक्षण प्रसारक विद्यालयात जलसप्ताह!

पुसद :उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके बसू लागले की पाण्याचे महत्त्व कळू लागते. खरे तर जल म्हणजे जीवन. सिंचन, बांधकाम तसेच औद्योगिक वापरासाठी पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. त्यामुळे भूजल पातळी घसरत आहे. पाण्याशिवाय जिणे अशक्य असल्याने जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच जलसंवर्धनाचे महत्त्व ओळखले पाहिजे, जलसंवर्धन ही जल चळवळ झाली पाहिजे, असे विचार पर्यावरण अभ्यासक डॉ. माधवी गुल्हाने यांनी व्यक्त केले.
पुसद पाटबंधारे विभागाचेवतीने जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात जल सप्ताहाचे आयोजन १६ ते २२ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये जल जागृती व्हावी या उद्देशाने जलसंवर्धन या विषयावर रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभात जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या मुख्याध्यापक डॉ. माधवी गुल्हाने बोलत होत्या. या कार्यक्रमाला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अविनाश भगत यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी पाटबंधारे विभागाचे व्ही. एस.तिलवंत, जी.डी.भगत, एस. बी.जगताप, जे.डी. चिरांगे, एम.जी. राठोड,कु. एस. व्ही.गडदे,कु. यु. एम. थोरात,कु. एन.सी. इंगळे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या इको क्लबच्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.
रांगोळी स्पर्धा : अ गट- प्रथम क्रमांक धनश्री राठोड, द्वितीय चंचल आडे, ब गट – प्रथम क्रमांक ममता वाकोडकर, द्वितीय अर्चना मोहाळे
निबंध स्पर्धा : प्रथम क्रमांक ओवी राठोड, द्वितीय भक्ती राऊत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इको क्लबच्या वर्षा इंगळे यांनी केले. भारतीय कीर्तनकार यांनी आभार मानले.